पंढरीचा विठ्ठल साऱ्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत, अठावीस युगे कर कटेवरती ठेऊन लेकरांची राखण करती आला आहे. भक्तांच्या सुखदुःखात साथ देणारा विठूचे अगदी सर्वांच्या हृदयात स्थान आहे.वारकरी दरवर्षी  पंढरीच्या वारीला जात असतात, ठिकाठिकाणाहुन दिंड्या, पालख्या निघत असतात, भक्त दंग होऊन भक्तीत रमून जातात,  कोणत्या ना कोणत्या रुपात विठू मदतीला धावून जात असतो मग तो दामाजीसाठी विठू महार होतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो जनीचा माय बाप होऊन सांभाळ करतो, तिचे दळण दळू लागतो. विठू त्याच्या लेकरांवर येणाऱ्या संकटाचे सावट मिटवत असतो. भक्तगणांचे आणि विठू माऊलीचे नाते वर्णावे तेवढे कमीच आहे. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाई अशा अनेक संतांनी विठ्ठलाची भक्ती मनोभावे केली आहे. भक्तीरसात न्हाऊन गेले आहेत. सर्वांच्या मनामधील  विठ्ठलाविषयी माया, त्याची लागलेली गोडी, त्याची भक्ती,भागामध्ये वर्णन केले आहे.