गणपतीची अनेक रूपं आहेत. मयुरेश्वर, सिद्धिविनायक, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर आणि महागणपती अशी गणपतीची विविध रूपं आणि अनेक नावं. या सर्व रुपांना आपण अष्टविनायक म्हणतो. अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सर्व गणपतींची आणि त्यांच्या मंदिरांची लीला अगाध आहे. पौराणिक महत्त्व असलेले अष्टविनायक गणपती इतके प्राचीन आहेत की गणेशपुराण आणि हिंदू धर्माची संपूर्ण माहिती सांगणाऱ्या मुद्रल पुराणात त्यांचा उल्लेख आढळतो. यामागे एक पौराणिक कथा अशी आहे की, सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाने गणपतीसाठी एक भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी अशी होती की, गणेश प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या रुपात प्रकट होईल. सतयुगात विनायकाच्या रुपात, त्रेतायुगात मयुरेश्वर, द्वापारयुगात गजाननाच्या रुपात गणेश देव प्रकट होतील. तसेच धूम्रकेतूच्या रुपात कलियुगात गणपतीची उपासना केली जाईल. गणपतीची ही नानाविध रूपं , गणपतीची ८ शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात. आज या ८ रूपांची ८ मंदिरं स्थापन झाली आहेत. या मंदिरांमध्ये कायम भक्तांची गर्दी असते. आज याच आठ रूपांच्या आठ मंदिरांची यात्रा 'अष्टविनायक यात्रा' ओळखली जाते.